Thursday, 12 June 2008

प्रतीक्षा

"काय हो! अजुन कसा नाही आला?"
"येईल ग! बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, पाऊस केवढा पडतोय"
"काल पण अंमळ उशीराच फोन आलेला"
"अग काम पण तेवढच असते त्याला"
"खाण्या-पिण्याची हेळसांड, वेळेवर झोपायचे नाही, लवकर उठायचे नाही आणि ह्यांना योगा प्राणायाम पण नको करायला"
"आपणच करूया का फोन?"
"नको, आपण फोन करायचो आणि नेमका मीटिंग मध्ये असायचा"
"हो हो त्यापेक्षा आपणच वाट पाहु"




"कधीची फ्लाइट आहे रे?"
"................."
"मग आम्ही येऊ का विमानतळावर तुला घ्यायला?"
"..................."
"अरेय त्यात त्रास कसला?"
"...................."
"बर ठीक आहे"

"काय बोलला?"
"म्हणतोय एवढ्या उशिरा फ्लाइट येणार तुम्ही कशाला येता झोप मोड करून? तोच येईल टॅक्सी पकडून"
"पण मी म्हणते एक दिवस नाही काढली झोप तर कुठे बिघडताय?"
"आता तो बोलला आहे ना! आणि येतोय की चांगले 5 आठवद्यसाठी तेव्हा भेटा माय-लेक
हवे तेवढे"
"ठीक आहे घरीच वाट बघुया त्याची, मला नाही काही झोप यायची"


"काय हो जमताय का तुम्हाला?"
"जमतय म्हणजे काय! तो म्हणाला की खूप लवकर शिकलो कंप्यूटर त्या कुलकर्णीना अजुन माउस पण फिरवता येत नाही,
"हे बघा काही तरी आलय"
"आता बघ इथे असा हा ई मेल लिहायचा मग ह्या इथे एड्रेस टाइप केला की लगेच हे सेंट बटन दाबायचे की लगेच
त्याला ई मेल पोहोचलाच म्हणून समज"
"आणि मग?"
" मग काय? आता त्याच्या ई मेलची वाट बघायची"


"छे! पुन्हा गेले कनेक्शन"
"हो पण दिसला की तो ह्या वेळेला"
"नातू अगदी सुनेवर गेलाय तुमच्या,
किती मोठा झाला ना?"
"आता ह्यावर्षी पासून तिथल्या शाळेत जाणार म्हणे"
"आता एकदा शाळा सुरू झाली म्हणजे कधी येणे होते त्याचे कुणास ठाऊक?"
"आठवड्याच्या आठवड्याला भेटतो की इथे कंप्यूटर वर"
"हो! नातवाला नुसते कॅमेरातूनच मोठा होताना पाहतेय"
"काय करू आता? पुन्हा कनेक्शन लागतेय का बघू?"
" नाहीतर त्याच्या फोनची वाट बघुया"

Thursday, 10 April 2008

कुटूंबवत्सल weekend

कुटूंबवत्सल weekend ही काय भानगड आहे? अगदी माझ्यासारख्या मुंबईबाहेर जॉब करणार्‍यादेखील ही संकल्पना तशी नवीनच. एखाद्या weekendला माझ्या मुंबईत येण्याची घोषणा झाल्यापासूनच आईचे खायला काय करू आणि काय नाही असे सुरू होते. (आणि माझे काय खाऊ आणि काय नाही असे)
तर असो, officeमधून बाहेर पडायच्या आधी नेहमीची मित्राना मेला-मेली करून नाहीतर फोनकरून भेटण्याचे plans होतात आणि माझा 4 ते 5 दिवसांचा हा extended weekend असा घर आणि मित्रांमध्ये सम-समान वाटला जातो. पण ह्या वेळेच्या तर 2 दिवसांच्या तूटपुंज्या रजेमध्ये काय आखावे आणि काय वगळावे हा भारी प्रश्न होता. आणि शेवटी एक कुटूंबवत्सल weekend घालवायची कल्पना डोक्यात चमकली. कधी नव्हे ती बस अगदी वेळेवर पोहोचली. सकाळी 8 वाजता पोहोचताच "हा संपूर्ण weekend मी घरी असणार असल्याची घोषणा केली" आईने "काय?" म्हणून जोरात react केले (तेव्हा ती अगदी "अवघाची संसार" मधली सुहिता थत्ते सारखी दिसली) बाबा पण खुश झाले. बाकी नाष्टयाची तय्यारी अगदी जोरदार चालू होतीच.
बाबा सकाळी सकाळी ई TVवर राजू परुळेकरचा "परत्यक्त्या स्त्रीयांचे कायदेशीर हक्क" हा परी-संवाद पहात होते (म्हणजे विषय कितीही सामाजिक बंधिलकीचा असला तरी सकाळी 8 ही काय वेळ झाली?).
"लवकर आवरून घे; नंतर लाइट जाईल" आईने नाष्टयाचे आवरता-आवरताच फर्मान सोडले. Load Shedding, नवी-मुम्बईला शिफ्ट झाल्यापासूनचे आमच्या मागे लागलेले नवीन भूत. बृहन-मुंबईमध्ये असताना वीज किती जीवनावश्यक गोष्ट आहे हे कधी कळलेच नाही,आता त्याची जाणीव दिवसातून 4 तास होत असते. अगदी ठरल्या वेळेप्रमाणे 10.30ला वीज गेलीच. आता 2 तासाची निश्चिंती,
" जरा भाज्या घेऊन या दोघे बाप-लेक" आईचे दुसरे फर्मान,
बहुतेक शनिवारी दुपारी मित्रांबरोबर बाहेर कुठे ना कुठे लंचचा प्रोग्रॅम असतो त्यामुळे आईने लंचची तय्यारी केली नसणार. बर्‍याच दिवसांनी बाजारात आलो तर 3 नवीन सूपर मार्केट्स उघडलेली आणि तरी बाबा आपले नेहमीच्याच भाजीवाल्याकडे वळताना दिसले.
"तुम्ही 'spencer' नाहीतर 'more' मधून भाज्या का नाही घेत?"
"का?"
"त्या जास्त फ्रेश आणि हायजिनिक असतात"
"अच्छा, अस कोण बोलत?"
"तेच सांगतात" (माझे उत्तर मलाच खटकले)
"असेलही, पण म्हणून ह्यांच्याकडच्या भाज्या फ्रेश आणि हायजिनिक नाहीत?"
बाबांचा युक्तिवाद पटतही होता आणि कुठे तरी आपले काहीतरी चुकतेय ह्याची जाणीव होत होती.
Economic independence मधून आलेली जी एक purchasing power आहे त्याचा आपण गैरवापर तर करत नाही ना? जे महाग, झकपक, चमकदार तेच चांगले मग तो multiplex मधला सिनेमा असो की, मॉल मधली खरेदी पण value for moneyचे काय?
"चिकू घेऊ का रे तुझ्यासाठी? तिथे नसतील मिळत चांगले" बाबांनी विचारले

"दादा तुमचा मुलगा वाटतो? आधी कधी नाही पाहिला" चिकूवालीने एक कटाक्ष माझ्याकडे
टाकत विचारले

"हो, तो तिथे हैदराबादला असतो"


कदाचित फ्रेश भाज्यांसोबत अशी जिव्हाळ्याने चौकशी करणारी माणसे spencer आणि more मध्ये भेटत नसतील. घरी आल्यावर मस्त नाटकाचा बेत करायचे ठरले. लोकसत्तेमध्ये पाहिले तर 4.30ला वाशीच्या विष्णुदास भावेला अशोक हांडेचे "मराठी बाणा" लागलेले. आईला पटापट जेवणाचे आवरून घ्यायला सांगितले आणि साधारण: 2ला घर सोडले. पोहोचेपर्यंत पावणे तीन झालेच आणि बुकिंगसाठी ही भली मोठी लाईन. मराठी बाणा चे तिकीट तब्बल 250 रुपये पण 'मराठी बाणा' बद्दल खुपसे चांगले ऐकले होते आणि खरोखरच "मराठी बाणा"एक अप्रतिम अनुभव देऊन गेले.
पहाटेच्या वासुदेवाच्या गाण्याने सुरू झालेला तो नृत्य-संगीताचा खेळ गारुड, लावणी, अभंग, ओव्या, पोवाडे, भावगीत,भक्तीगीत असे करत करत एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला. शो संपेपर्यंत साडे सात झाले, थोड्या वेळ इथे तिथे भटकून मग Dominos चा रस्ता गाठला. सुरुवातीला आई बाबा pizza काही फारसे आवडीने खात नसत. पण आता त्यांच्याही जीभेवर मोझरेलाची चव रुळलीये.
घरी येईपर्यंत खूप उशीर झालेला. आदल्या रात्रीच्या बस प्रवासाचा क्षीण आणि दिवसभराच्या धावपळीचा थकवा ह्यात झोप कधी लागली कळलेपण नाही. सकाळी साधारण: सातला जराशी जाग आली बाहेर पाहिले तर आई बाबा आस्था चॅनेल लावून प्राणायाम करत होते. मी पुन्हा चादर डोक्यावर घेऊन गुडूप झालो.
"अरे नऊ वाजले, तासाभरात लाईट जाईल पुन्हा"
"रविवारी पण ?"
"मग काय, चल उठ आता आणि पॅकिंग करायला घे"

अरे हो, फक्त 2 दिवस होते ह्यवेळी, पोहे आणि चहा झाल्यावर मित्रांना फोन करायला घेतले.सगळ्यांच्या अगदी मनसोक्त शिव्या खाल्या. तक्रारीचा सूरही "अरे निदान एक दिवस सुट्टी घेऊन तरी यायचे" असाच होता. पण client visit आणि upcoming deliveryमध्ये सुट्टीचा विषय काढायची माझी काय बिशाद?
दुपारच्या जेवणात एकूण एक माझ्या आवडीच्या गोष्टी होत्या (नेहमीच असतात म्हणा) आणि शिवाय सोबत घेऊन जायचे भुकलाडु तहानलाडु ते वेगळेच. पोटभर जेवून जरा वमकुक्षी घ्यायचा विचार केला. मध्येच जाग आली तर बघतो तर पंखा फिरायचा बंद, आई लगेच पेपर घेऊन वारा घालू लागली. मी हटकलेच "अग आता हे कशाला?"
"असु दे पुन्हा बस मध्ये नीट झोप नाही लागणार" माझा काही इलाज नव्हता,
थोड्या वेळ झोप काढून निघायच्या तय्यारीला लागलो, जाताना बाबा कॅलंडरकडे बघून बोलले "महावीर जयंतीची सुट्टी आहे का रे तुम्हाला? सोमवारी येतेय, म्हणजे जास्त सुट्टी घ्यायला नको"
"अहो बाबा, MNCमध्ये कसली आलीये महावीर जयंतीची सुट्टी" त्यांच्या पडलेल्या चेहर्‍याकडे बघायची हिंमत नवती माझी. केबलचे पैसे घ्यायल्या येणार्‍या पोर्‍यासारख्या महिन्याच्या महिन्याला आमच्या फेर्‍या होतात, माहीत नाही का; पण अपराधी आणि अगतिकपणाचि एक वेगळीच भावना मनाला चाटुन गेली, practical होण्याच्या नादात आपण दगड तर नाही बनत चाललो ना? तेवढा विचार करायला पण वेळ नव्हता; नाहीतर बस सुटली असती. भले सतत त्यांच्या बरोबर रहता येत नसेल पण असा एखाददुसरा कुटूंबवत्सल weekend घालवायला काय हरकत आहे? बघुया कसे जमतेय ते.

Tuesday, 25 March 2008

वळू'या


वळू बघायचा खूप दिवसांपासून डोक्यात होतेच. माझ्या प्रत्येक मुंबई फेरीमध्ये वळू कुठे जवळ्पास लागलाय का ते बघायचो. नवी मुंबई मध्ये भले खूप सारी नवी चित्रपटगृहे उघडली असतील पण एका मध्ये मराठी चित्रपट लागेल तर शपथ्थ! आणि अगदी लागलेच तरी ते मकरंद अनासपुरे नाहीतर भरत जाधव च्या पुढे जाणार नाहीत. ह्यावेळेला मस्त होळीचा long weekend मिळाला आणि वळू बघायचा नक्की करूनच बस मध्ये चढलो. घरी येऊन बघतो तर प्लाझाला 12.30चा शो होता. आता खारघरहून दादर म्हणजे बसने जा नाहीतर ट्रेनने दीड-एक तासाची रपेट आहेच. तरी 11.15ला दादरला पोहोचलोच. प्लाझाला पोहोचे पर्यंत 11.30 झाले. आणि बघतो तर करन्ट बूकिंगसाठी ही भली मोठी लाइन. सेक्यूरिटी वाल्याकडून आधी कन्फर्म करून घेतले लाईन नक्की वळूसाठीच आहे ना की 3.30च्या 'रेस' साठीची ही गर्दी? टिकिट खिडकीवर पोहोचेपर्यंत अजुन एक धक्का मिळालाच (आधी दु:खद पण नंतर सुखावणारा). बाल्कनी चक्क हाउस-फुल्ल, प्लाझाच्या door keeperही बहुतेक मॅटिनीला हाउस फुल्लचा बोर्ड बर्‍याच दिवसानी पहिला असेल. बाबांना executiveच्या लाइन मध्ये उभे केलेले, ते मस्त दिमाखात 3 टिकेट्स घेऊन आले. नेहमीच्या जाहिराती आणि खास मराठी कलावंतनी गायलेले जन-गण-मन झाल्यावर वळू सुरू झाला.


तर हा वळू आहे महाराष्ट्रातल्या कुसवड गावातला, देवाजीच्या नावाने सोडलेला सगळ्यांच्या लाडका वळू(डुरक्या) आधी धटिन्गण आणि मग उपद्रवी बनून जेव्हा गावात धुमाकूळ घालू लागतो. तेव्हा वन-विभागातून खास 'फॉरेस्ट'ची बोलावणी होते. हा चित्रपट वन अधिकारी स्वानंद गड्डमवारच्या नजरेतून आणि त्यांचा लहान भाऊ समीरच्या कॅमेर्‍यातून आपल्याला कुसवड गावाचे रहिवाशी आणि त्यांची छोटी-छोटी स्वप्ने, घुसमट, अडचणी, कट-कारस्थाने दाखवतो. एका बिबळ्या स्पेशलिस्ट वनअधिकार्‍याची (अतुल कुलकर्णी) वळू पकडायच्या मोहीमेवर रवानगी होते, एक थ्रिलिंग documentryकरता येईल म्हणून त्यांचा लहान भाऊ त्याना साथ करतो, त्या दोघांच्या दीमतीला गावचा बडबोल्या जीवन आणि मग सुरू होतो वळू(डुरक्याचा) शोध. गावचे म्हातारे सरपंच आणि तरुण नेतृत्वामधला संघर्ष, शंकारच्या मंदिराची देखभाल करणारे गावातले एकमेव ब्राह्मिण कुटुंब, पिक्चर बघून प्रेमात पडणारी शिवा-संपीची जोडी, सार गाव जरी विरोधात गेले तरी डूरक्याला श्रद्धेने घास खायला घालणारी म्हातारी, डुरक्याला वाचविण्यासाठी खंभीर उभी राहणारी एक वेडी आणि आपल्या पोरीची 'डोक्‍यूमेंट्री' काढून घ्यायला आकाश-पाताळ एक करणारी आई, सगळेच कसे खरे वाटतात आणि त्यामुळेच सहज भावतात. चित्रपट कुठेच खूप गदागदा हसवत नाही की फार मोठा सामाजिक संदेश देत नाही, तो आपल्याला त्या गड्डमवारसाहेबांबरोबर कुसवडला घेऊन जातो आणि डुरक्याला पकडून घेऊन पुन्हा आपल्या घरी आणून सोडतो. एक साधी सरळ कथा तेवढ्याच साध्या सरळ पद्धतीने मांडतो. नजीकच्या काळात गावाला जाणे झालेच नाही म्हणुनही असेल कदाचित पण कुसवड गाव बघता क्षणीच आपलेसे वाटते.

अतुल कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर , मोहन आगाशे, भारती आचरेकर, निर्मीती सावंत आणि ज्योती सुभाषसारखे दिग्गज आपली भूमिका अगदी जगले आहेत. गावातली रख-रखित शेते आणि नागमोडी रस्ते आणि त्यामध्ये उभा उमादा डुरक्या, जोडीला साजेसे असे पार्श्वसंगीत वळूच्या सगळ्याच बाजू जमेच्या वाटल्या. 2 तासात गावाची रॅपेट मारुन पुन्हा आपल्या जागी परत. वळू 9व्या आठवड्यात पण हाउस-फुल्ल कसा याचे उत्तर मला मिळाले. आणि मागल्या काही आठवड्यात मी sunday आणि 10000 B.C. सारख्या moviesवर एवढा वेळ आणि पैसा का फुकट घालवला? असे प्रश्न उभे राहीले. सगळेच नवीन मराठी movies काही बघणेबल नाहीत पण गेले काही अनुभव (यंदा कर्तव्य आहे, मातीच्या चुली आणि नितळ सारखे निखळ चित्रपट) पाहिल्यावर खरच असे वाटते निदान मराठी चित्रपट पाहायला तरी आता चित्रपटगृहांकडे वळूया.

Tuesday, 5 February 2008

चार वर्षे कशी गेली कळली देखील नाही


आत्ताच तर F.E. ची Exam दिलेली लगेच B.E. देखील आली


Ragging होता होता


Ragging घ्यायची वेळ आली


आता कुठे Freshies ची मजा उतरत होती


तर farewell ची धून्दि चढू लागली


Assignments copy करता करता वेळ कसा मजेत जायचा


Drawing sheets काढताना मात्र खूप कंटाळा यायचा


F.E असताना मात्र mechanics ने वाट लावली


G.T. मारुन फायदा काय K.T. तरीपण लागली


S.E., T.E. तर फुल्ल तू धम्माल


Space & Techno मे बित गये साल


Ballroom Dancing तर बाहेरूनच बघितला


Rose Dayचा गुलाब कधीच नाही बहरला


Submissions करता करता Semester संपली


अभ्यास करायला हातात फक्त P.L.च उरली


मग आल B.E. सगळे झाले serious


आले industrial Visit, Projetcs आणि campus चे दिवस


त्यात मिळाली नोकरी, न मिळता छोकरी


फरक काही पडत नाही, मिळाली ना degree


पण आता .....पुढे


आठवणी आठवणी अन् आठवणी

Wednesday, 30 January 2008

बोलले कुणी काहीजरी !!!

बोलले कुणी काहीजरी मी विश्वास ठेवत नाही
तुझी आठवण मनातून माझ्या अजूनही जात नाही!

साडे-पाचची ती सांजवेळ मी अजूनही पाळतो आहे
मागविलेले Cold drink अर्धे तुझ्यासाठी ठेवतो आहे
चौपाटीवरचा वाळूचा किल्ला अजूनही अर्धाच राहिलाय
तुझ्यासाठी आणलेला गजरा कधीच कोमेजून गेलाय
विसरून गेलीस तू मला हे माझ्या मनाला पटत नाही
तुझी आठवण मनातून माझ्या अजूनही जात नाही!

Pictureची दोन तिकिटे काढून तुझी वाट पहात बसतो
तुझ्या आवडीची गाणी एकटाच गुण-गुणत असतो
भेटीच्या त्या जागी आज एकटाच भटकतोय
मजनू,देवदास दिवाणा म्हणून जो तो मला हसतोय
सगळे जरी हसले मला तरी तू मला हसणार नाही
तुझी आठवण मनातून माझ्या अजूनही जात नाही!

दरावरची बेल वाजवत बसतो
बंद दरवाजा लक्षातच येत नाही
अपराध्या सारखा मग मी माझ्याच घरात शिरतो
अन् तुझ्या फोटोवरचा हार हळूच सरळ करतो
कसे समजावू मनाला की तू परत कधीच येणार नाही
तुझी आठवण मनातून माझ्या कधीच जाणार नाही!

Friday, 11 January 2008

कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज canteenच्या कटींगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
A\C Coneference roomsमध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी, कृष्णन आणि रेवतीने घेतली ODCमध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक Software प्रोफेशनल आहे

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो-तो projectमध्ये बिझी ज़ालाय
भुला भटका missed call आता महाग झालाय
forwards आणि chain mailsमध्ये खुषालीची मैल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलेब्रेशन्स,पार्टीज साठी pizza hutchaचा रस्ता गाठतो
vegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो
पण pocket moneyसाठवून केलेल्या partyची मजा ह्यात शोधत आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे


बरेच दिवस झाले इथे हैदराबादला येऊन
सुरुवातीला होमसिक वाटले, आता घेतलीये सवय करून
आमच्या जुहु चौपाटीची जागा एथे हुसेन सागर ने घेतली
बॅंगलुर, मैसोर हैदराबादच्या गर्दीत माझी मुंबई मात्र हरवली
निदान पुणे पोस्टिंग मिळावे म्हणून प्रयत्न करतो आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे


खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
officeमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे