Sunday 6 November 2016

या रे या। सारे या।

गेल्यावेळी जेव्हा आई बाबांबरोबर 'वळू' चित्रपट बघितला तेव्हाच मराठी सिनेमा काहीतरी वेगळे करतोय आणि प्रेक्षकांना काहीतरी विलक्षण देतोय ह्याची जाणीव होत होती. आज आठ वर्षानंतर 'व्हेंटिलेटर' बघताना लक्षात येते कि इतक्या वर्षात मराठी सिनेमा किती प्रगल्भ झालाय. ज्या चित्रसृष्टीत नटसम्राट, सैराट आणि व्हेंटिलेटर सारखे सिनेमे एकाच वर्षात येतात, त्याला मराठी सिनेमासाठी हा सुवर्णकाळच म्हंटला पाहिजे.

तर आता थोडे 'व्हेंटिलेटर' 'वळु'या, मला वळू आणि व्हेंटिलेटर मध्ये बरेंच साम्य वाटले. तिथे जसा वळू हा केवळ निमित्तमात्र होता आणि मूळ कथा हि त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये गुंतलेली होती, तसंच इथेही काहीसं आहे. व्हेंटिलेटरवर असलेले गजानन कामेरकर हे म्हणजे निमित्त, खरी कथा हि त्यांच्या गोतावळ्याची.

व्हेंटिलेटर चे खरं यश हे त्याच्या ११६ कलाकारांना स्वतंत्र व्यक्तिमत्व देणाऱ्या त्याच्या पटकथेत आहे. गोष्ट तशी छोटीचं आपल्या आजूबाजूला घडणारी पण त्यातली पात्र परकी नं वाटता आपल्याच ओळखीची वाटतात.

काळाच्या रेट्यात दुरावत गेलेली नाती, अहं आणि स्वार्थाच्या ओझ्याखाली गुदमरलेली आपुलकी आणि मुळातच लोप पावत चाललेली कुटुंबव्यवस्था हा सिनेमा आपल्या डोळ्यापुढे आणून ठेवतो. आणि आपसूकच आपण त्यात गुंतत जातो, त्या पात्रामध्ये कित्येक वेळा आपण आपली दूरची मावशी किंवा गावचे काका पाहतो. सिनेमातले एक वाक्य माझ्या मनात घर करून राहिले "नाती टिकवणे म्हणजे रोज सकाळी ब्रश करण्यासारखे आहे, सतत घासत नाही राहिलं तर त्यावर थर जमा होतो".

रोजच्या रुटीन मध्ये अडकलेल्या आपल्यापैकी किती जणांना नाती जपायची ओढ आहे? सुखाच्या किंवा दुःखाच्या क्षणी भेटण्याखेरीज कोण कोणाला सहज भेटतो आजकाल? असे अनेक प्रश्न हा चित्रपट आपल्या समोर आणतो आणि काहीसा अंतर्मुग्ध करतो.  एखाद्या सिनेमा साठी ह्याहून मोठे यश ते काय?

वळू बघताना मी म्हंटले होते की मराठी सिनेमाच्या ह्या नव्या वाटेकडे 'वळू'या, आज व्हेंटिलेटर बघून आल्यावर म्हणावेसे वाटतंय कि मराठी सिनेमाच्या या सुवर्णयुगात या रे या । सारे या।

Friday 26 March 2010

मी प्रेम आणि प्रेमकविता

आज मस्त प्रेमकविता करावीशी वाटतेय

प्रेमात पडलोय म्हणून,
किंवा पडावेसे वाटतेय म्हणून नव्हे!!
....नुसतीच आपली प्रेमकविता
..तिच्या डोळ्यावर...तिच्या हसण्यावर
...तिच्या रूसण्यावर..अगदी तिच्या माझ्या बरोबर असण्यावर...

काय विचारता?? प्रेरणा कुठून मिळतेय?


अहो! प्रेमकविता करण्यासाठी प्रेमात असायला थोडीच लागते?
चांगले ओम्लेट बनवायला अंडे उबवावे थोडीच लागते?

प्रेमकविता करून, प्रेमाची हौस भागवून घेतोय
कोणाच्या प्रेमात बुडून जावे, अश्या तिची वाट बघतोय,

so back to कविता, आह! प्रेमकविता
प्रेमकवितेत कसे सगळे प्रेमळ प्रेमळ असते
पण खरचं प्रेमात पडल्यावर तसे काही होते?

प्रेमात असल्यावर म्हणे as follows होते:

तिच्या बरोबरची ३ तासाची date एका क्षणात उडून जाते
Einstein ची theory of relativity इथे prove होते
तिच्यासोबत म्हणे तेलुगु picture पण समजतो
एरवी irritating असलेला तुषार कपूर पण tolerable होतो

प्रेम म्हणजे long drive, प्रेम म्हणजे SMS वर SMS
प्रेम म्हणजे ice cream sharing, प्रेम म्हणजे IPL Matches

पाडगावकर म्हणतात न, सगळ्यांचे सेम असते
तरीपण माझेच प्रेम सच्चे असा ज्याचा त्याचा claim असते

पण प्रेम म्हणजे serious matter बाबा!

प्रेम म्हणजे Java code
च्यायला कळता कळत नाही
सगळे जुळून आले तर ठीक
नाहीतर वळता वळत नाही

आता हेच बघा न, प्रेमकविता करायला घेतली, पण भलतेच होऊन बसले
उद्या जर का प्रेमात पडलो तर, बाप रे!

-- मूळ कवी : अभिजित अरुण चोणकर

Wednesday 6 May 2009

Rehna Tu...जशीच्या तशी

तुहीन Australiaला गेल्यापासून मी हिंदी चित्रपटसंगीत मध्ये काय ऐकवे आणि काय नही हयात बरीच मदत करतो. त्याला बर्‍याचदा सांगूनही त्याने दिल्ली6 ची गाणी ऐकली नव्हती.
रेहमान आणि प्रसून जोशीचे मस्त समीकरण जुळले आहे आणि ते खुपदा R.D. आणि गुलझार ची आठवण करून देतात. सध्या आम्हा दोघांनाही "रेहना तू " गाण्याने sollid भांडावून सोडले आहे. त्याचा स्वैर अनुवाद करण्याचे डोक्यात आले.

तू मात्र रहा
जशीच्या तशी
थोडेसे दु:ख
तर कधी खुशी

(Rehna Tu
Hai Jaisa TU
Thoda sa dard tu
Thoda Sukun)

तू मात्र रहा
जशीच्या तशी
हवेची मंद झुळुक
तर झूंझार कधी

(Rehna Tu
Hai Jaisa TU
Dheema Dheema jhonka
Ya phir junoon)

तू रेशमी
तू हविहवीशी
रखरखीत कधी
तर अल्लड कधी
तू तर भांडखोर
परिमळ तुझा दरवळतो चौखेर

(Thoda sa resham
Tu humdam
Thoda sa khurdura
Kabhi daud jaye
Ya lad jaye
Ya khushboo se bhara)

तू बदलू नकोस किंचिताही
ना उद्या ना आज
अशीच सदैव रहा
निर्लेप अन निर्व्याज

(Tujhe badalna na chahoon
Rati bhar bhi sanam
Bina sajawat milawat
Na jyaada na hi kaam)

तू दिलेल्या घावांवर
मलम पण तूच आणून दिलेले

त्या जखमे वर देखील मी जीव ओवाळुन टाकतो
ह्या अथांग सागारात मी खोल बुडून जातो

(Tu zakham de agar
Marham bhi aakar tu lagaaye
Zakham mein bhi mujhko pyaar aaye

Dariya o dariya
Doopne de mujhe dariya
Doopne de mujhe dariya)

तू मात्र रहा
जशीच्या तशी
थोडेसे दु:ख
तर कधी खुशी

तू मात्र रहा
जशीच्या तशी
हवेची मंद झुळुक
तर झूंझार कधी

एकसाथ चालताना हात
आपले दूर का म्हणून?
चल जाउ दूर वर
एकमेकानांच्या हातात हात मिसळून

(Haath tham chalna hi
To dono ke daye haath sang kaise
Haath tham chalna hi
To dono ke daye haath sang kaise

Ek daaya hoga ek baaiya hoga
Tham le haath yeh thaam le
Chalna hai sang tham le)

Tuesday 14 April 2009

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

माझ्या परंपरागत इंग्लीश ब्लॉग्सना काट्शह देऊन हा पोस्ट मराठी मधून लिहितोय. आता इथे काही ठिकाणी माझी मराठी शब्द संपदा खूप तोकडी पडते, एकतर ब्लॉग, पोस्ट ह्याना मराठी प्रतिशब्द काय? दुसरे म्हणजे मराठी मध्ये टाइप\एडिटिंग करणे म्हणजे भारी वैताग.
असो, तर ह्या गुड फ्रायडेच्या दीर्घ वीकेंड्ला "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" बघायचा असा पण करूनच मी मुंबईकडे कूच केले. एकतर चित्रपटाला मिळालेली प्रसिद्धीमुळे त्या बद्दलची उत्कंठा आणि अपेक्षा दोन्ही शिगेला पोहोचलेल्या. घरी येऊन बघतो तर मुंबई मध्ये चक्क 50 हून अधिक सिनिमा गृहामध्ये हा चित्रपट झळकलेला, बहुतेक इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबई मध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ, खारघर मध्ये नव्यानेच 'बिग सिनिमा' उघडलेला त्याचे उद्‌घाटन करायला ह्याहून योग्य चित्रपट नव्हता"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" गोष्ट आहे दिनकर भोसलेची (सचिन खेडेकर) मध्य-मुंबईच्या आपल्या वाडीलोपरजित बंगल्यात दोन पोट भाडेकरू सोबत राहणारे (अनुक्रमे एक मुस्लिम आणि एक उत्तर भारतीय) D. M. भोसलेनचे चौकोनी कुटुंब, मुंबईतल्या कुठल्याही सर्व सामान्य मध्यम वर्गीयासारखेच त्यांचे प्रश्न, समस्या.
आपल्या बँकेतल्या तुट्पुन्ज्या पगारावर घर चालवताना होणारी कुचंबणा , रोज रोज त्याच त्याच भाज्या (खासकरून बॉम्बिल\मांडेली)खाऊन वैतागलेल्या सौभाग्यवती भोसले (सूचित्रा बांदेकर) निव्वळ अर्धा टक्का कमी पडला म्हणून इंजिनियरिंग न करू शकणारा आणि पैसे चारून प्रवेश घेण्यात असमर्थ असलेला जूनियर भोसले (अभिजीत केळकर) आणि फक्त मराठी आहे म्हणून हिंदी चित्रपटाच्या ऑडिशन्स मधून बाहेर काढली गेलेली शशिकला भोसले (प्रिया बापट). चित्रपटाचा पुर्वार्ध ह्या सगळ्या व्यक्तीरेखा नीट रेखाटण्यात जातो.
चित्रपटातले कित्येक प्रसंग थेट आपल्याच आयुष्यातून चोरून नेल्यासारखे वाटतात आणि नकळतच आपण D. M. भोसलेच्या आयुष्यात गुन्तत जातो. त्यांची घालमेल तगमग मनाला पटते आणि टोचत राहते.त्यातच भोसलेच्या गोजिरवाण्या (??) बंगल्या वर एका मोठ्या बिल्डरची (विध्याधर जोशी) नजर पडते मध्य- मुंबईतल्या बंगल्याच्याजागी एक टोलेजंग टॉवर बांधून भोसले कुटुंबाची रवानगी बदलापूरला करण्याचा बिल्डरचा प्लान असतो. मोठे घर, सन्त्रो गाडी अश्या आमिषने सौ. भोसले लगेच राजी होतात पण नेमका श्रियुत भोसलेनचा मराठी बाणा आडवा येतो. रोजच्या जीवानातले अपमान झेलत असतानाही भोसले आपला बाणा आणि कणा टिकवून ठेवायचा कसोशीने प्रयत्न करतात. पण एका कमजोर क्षणी त्यांच्या सबूरीचा बांध मोडून पडतो.अगतिक आणि पराजित भोसले समस्त मराठी पूर्वजांवर् तुटून पडतात आणि आपणास मराठी असल्याची शरम वाटते , ह्या देशात महाराष्ट्रीय असणे पाप आहे असे बोलतात. भोसलेनचे हे स्वगत थेट रायगडावरच्या शिवबाला ऐकायला जाते. आणि भोसलेना धडा शिकवायला शिवबा (महेश मांजरेकर) आणि रायबा (मकरंद अनासपुरे) मुंबईकडे कूच करतात. मराठी\महाराष्टीय असण्याचा अर्थ आणि सामर्थ्य काय हे समजावून शिवबा आपली भवानी तलवार भोसल्यांच्या हवाली करतात. इथून पुढे सुरू होतो भोसलेनचा लढा (आणि त्याच बरोबर चित्रपटाची घसरण).

भोसल्यांसाठी पुढची वाटचाल खूप कठीण असते रस्त्यात अनेक अडचणी येतात, मुलाचा अपघात, भ|डोत्री हल्लेखोर, अनेक धमक्या पण भोसले लोकाना (पक्षी प्रेक्षकाना )भाषणे देत देत, भरपूर टाळ्या आणि शिट्ट्या मिळवत खिंड लढवत राहतात.

"मी शिवाजीराजे ..." एक अत्यंत सफाईदार व्यावसायिक चित्रपट आहे , निवडणुकीची वेळ, मराठी चित्रपटांचा वाढत चाललेला दबदबा, मराठी वि. अमराठी विवाद असे अनेक पैलू हा चित्रपट आरामात स्पर्श करतो. चित्रपटाच्या खूप जमेच्या बाजू आहेत तेवढाच तो काही बाबतीत तोकडा देखील पडतो. 
जमेच्या बाजू: सहज सुंदर अभिनय, चित्रपटात सगळ्याच अभिनेत्यानी केलेला सहज अभिनय, सिद्धार्थ जाधवची निवड त्याच्या लोकप्रिएतेवर डोळा ठेवून केलेली वाटते आणि अपवाद महेश मांजरेकरने साकारलेला शिवबा फारच वयस्कर आणि काहीसा आजारी वाटला
संवाद, हमखास टाळ्या नाहीतर शिट्ट्या मिळवणारे संवाद, खासकरून भोसलेची भाषण बाजी चालू असताना, पण ते कुठेही रटाळ वाटत नाही (आणि थोडीशी नानाच्या क्रांतीवीर ची आठवण पण करून देतात)सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट कुठेही मराठी वि. उत्तर भारतीय वादावरची खपली काढत नाही, उलतपक्षी मराठी\महाराष्ट्रीयांच्या आजच्या परिस्थितीला बाव्हतांशी ते स्वत: जबाबदार आहेत असा मुद्दा मांडतो.

मग घोड आडते कुठे?....हा चित्रपट खूप बोलतो (खूप म्हणजे खुपच जास्त), चित्रपट बनवतानाच "बघा, कसा तुमच्यातला मराठी बाणा जागवतो "असा हेतू बाळगलेला दिसतो तसेच पूर्वार्धातील काही प्रसंगात खूप अतिशयोक्ती पण वाटली. पण तरीही ते कुठे खटकत नाही कारण सबंध चित्रपट आपल्यातल्या मराठी\महाराष्ट्रीयात्वाला गोंजारत राहतो, फक्त राहून राहून वाटते की थोडी मनोज कुमारगिरी कमी हवी होती.

तरीही "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" एक फर्मास चित्रपटनुभव देऊन जातो. 3 करोडहून जास्त बजेटमध्ये बनवलेला आणि खूप सार्‍या मोठ्या कलावंताना छोट्या छोट्या भूमिकेत घेऊन चित्रपट आपली स्टार वॅल्यू वाढवतो.उत्तम निर्मितिमुल्य, झक्कास संगीत आणि एकंदरीत प्रामाणिक प्रयत्नाचे श्रेय महेश मांजरेक्रला द्यायलाच हवेय. तुमच्यातला अभिमान जागो ना जागो, पण हा चित्रपट एकदा बघायला काहीच हरकत नाही.

Thursday 12 June 2008

प्रतीक्षा

"काय हो! अजुन कसा नाही आला?"
"येईल ग! बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, पाऊस केवढा पडतोय"
"काल पण अंमळ उशीराच फोन आलेला"
"अग काम पण तेवढच असते त्याला"
"खाण्या-पिण्याची हेळसांड, वेळेवर झोपायचे नाही, लवकर उठायचे नाही आणि ह्यांना योगा प्राणायाम पण नको करायला"
"आपणच करूया का फोन?"
"नको, आपण फोन करायचो आणि नेमका मीटिंग मध्ये असायचा"
"हो हो त्यापेक्षा आपणच वाट पाहु"




"कधीची फ्लाइट आहे रे?"
"................."
"मग आम्ही येऊ का विमानतळावर तुला घ्यायला?"
"..................."
"अरेय त्यात त्रास कसला?"
"...................."
"बर ठीक आहे"

"काय बोलला?"
"म्हणतोय एवढ्या उशिरा फ्लाइट येणार तुम्ही कशाला येता झोप मोड करून? तोच येईल टॅक्सी पकडून"
"पण मी म्हणते एक दिवस नाही काढली झोप तर कुठे बिघडताय?"
"आता तो बोलला आहे ना! आणि येतोय की चांगले 5 आठवद्यसाठी तेव्हा भेटा माय-लेक
हवे तेवढे"
"ठीक आहे घरीच वाट बघुया त्याची, मला नाही काही झोप यायची"


"काय हो जमताय का तुम्हाला?"
"जमतय म्हणजे काय! तो म्हणाला की खूप लवकर शिकलो कंप्यूटर त्या कुलकर्णीना अजुन माउस पण फिरवता येत नाही,
"हे बघा काही तरी आलय"
"आता बघ इथे असा हा ई मेल लिहायचा मग ह्या इथे एड्रेस टाइप केला की लगेच हे सेंट बटन दाबायचे की लगेच
त्याला ई मेल पोहोचलाच म्हणून समज"
"आणि मग?"
" मग काय? आता त्याच्या ई मेलची वाट बघायची"


"छे! पुन्हा गेले कनेक्शन"
"हो पण दिसला की तो ह्या वेळेला"
"नातू अगदी सुनेवर गेलाय तुमच्या,
किती मोठा झाला ना?"
"आता ह्यावर्षी पासून तिथल्या शाळेत जाणार म्हणे"
"आता एकदा शाळा सुरू झाली म्हणजे कधी येणे होते त्याचे कुणास ठाऊक?"
"आठवड्याच्या आठवड्याला भेटतो की इथे कंप्यूटर वर"
"हो! नातवाला नुसते कॅमेरातूनच मोठा होताना पाहतेय"
"काय करू आता? पुन्हा कनेक्शन लागतेय का बघू?"
" नाहीतर त्याच्या फोनची वाट बघुया"

Thursday 10 April 2008

कुटूंबवत्सल weekend

कुटूंबवत्सल weekend ही काय भानगड आहे? अगदी माझ्यासारख्या मुंबईबाहेर जॉब करणार्‍यादेखील ही संकल्पना तशी नवीनच. एखाद्या weekendला माझ्या मुंबईत येण्याची घोषणा झाल्यापासूनच आईचे खायला काय करू आणि काय नाही असे सुरू होते. (आणि माझे काय खाऊ आणि काय नाही असे)
तर असो, officeमधून बाहेर पडायच्या आधी नेहमीची मित्राना मेला-मेली करून नाहीतर फोनकरून भेटण्याचे plans होतात आणि माझा 4 ते 5 दिवसांचा हा extended weekend असा घर आणि मित्रांमध्ये सम-समान वाटला जातो. पण ह्या वेळेच्या तर 2 दिवसांच्या तूटपुंज्या रजेमध्ये काय आखावे आणि काय वगळावे हा भारी प्रश्न होता. आणि शेवटी एक कुटूंबवत्सल weekend घालवायची कल्पना डोक्यात चमकली. कधी नव्हे ती बस अगदी वेळेवर पोहोचली. सकाळी 8 वाजता पोहोचताच "हा संपूर्ण weekend मी घरी असणार असल्याची घोषणा केली" आईने "काय?" म्हणून जोरात react केले (तेव्हा ती अगदी "अवघाची संसार" मधली सुहिता थत्ते सारखी दिसली) बाबा पण खुश झाले. बाकी नाष्टयाची तय्यारी अगदी जोरदार चालू होतीच.
बाबा सकाळी सकाळी ई TVवर राजू परुळेकरचा "परत्यक्त्या स्त्रीयांचे कायदेशीर हक्क" हा परी-संवाद पहात होते (म्हणजे विषय कितीही सामाजिक बंधिलकीचा असला तरी सकाळी 8 ही काय वेळ झाली?).
"लवकर आवरून घे; नंतर लाइट जाईल" आईने नाष्टयाचे आवरता-आवरताच फर्मान सोडले. Load Shedding, नवी-मुम्बईला शिफ्ट झाल्यापासूनचे आमच्या मागे लागलेले नवीन भूत. बृहन-मुंबईमध्ये असताना वीज किती जीवनावश्यक गोष्ट आहे हे कधी कळलेच नाही,आता त्याची जाणीव दिवसातून 4 तास होत असते. अगदी ठरल्या वेळेप्रमाणे 10.30ला वीज गेलीच. आता 2 तासाची निश्चिंती,
" जरा भाज्या घेऊन या दोघे बाप-लेक" आईचे दुसरे फर्मान,
बहुतेक शनिवारी दुपारी मित्रांबरोबर बाहेर कुठे ना कुठे लंचचा प्रोग्रॅम असतो त्यामुळे आईने लंचची तय्यारी केली नसणार. बर्‍याच दिवसांनी बाजारात आलो तर 3 नवीन सूपर मार्केट्स उघडलेली आणि तरी बाबा आपले नेहमीच्याच भाजीवाल्याकडे वळताना दिसले.
"तुम्ही 'spencer' नाहीतर 'more' मधून भाज्या का नाही घेत?"
"का?"
"त्या जास्त फ्रेश आणि हायजिनिक असतात"
"अच्छा, अस कोण बोलत?"
"तेच सांगतात" (माझे उत्तर मलाच खटकले)
"असेलही, पण म्हणून ह्यांच्याकडच्या भाज्या फ्रेश आणि हायजिनिक नाहीत?"
बाबांचा युक्तिवाद पटतही होता आणि कुठे तरी आपले काहीतरी चुकतेय ह्याची जाणीव होत होती.
Economic independence मधून आलेली जी एक purchasing power आहे त्याचा आपण गैरवापर तर करत नाही ना? जे महाग, झकपक, चमकदार तेच चांगले मग तो multiplex मधला सिनेमा असो की, मॉल मधली खरेदी पण value for moneyचे काय?
"चिकू घेऊ का रे तुझ्यासाठी? तिथे नसतील मिळत चांगले" बाबांनी विचारले

"दादा तुमचा मुलगा वाटतो? आधी कधी नाही पाहिला" चिकूवालीने एक कटाक्ष माझ्याकडे
टाकत विचारले

"हो, तो तिथे हैदराबादला असतो"


कदाचित फ्रेश भाज्यांसोबत अशी जिव्हाळ्याने चौकशी करणारी माणसे spencer आणि more मध्ये भेटत नसतील. घरी आल्यावर मस्त नाटकाचा बेत करायचे ठरले. लोकसत्तेमध्ये पाहिले तर 4.30ला वाशीच्या विष्णुदास भावेला अशोक हांडेचे "मराठी बाणा" लागलेले. आईला पटापट जेवणाचे आवरून घ्यायला सांगितले आणि साधारण: 2ला घर सोडले. पोहोचेपर्यंत पावणे तीन झालेच आणि बुकिंगसाठी ही भली मोठी लाईन. मराठी बाणा चे तिकीट तब्बल 250 रुपये पण 'मराठी बाणा' बद्दल खुपसे चांगले ऐकले होते आणि खरोखरच "मराठी बाणा"एक अप्रतिम अनुभव देऊन गेले.
पहाटेच्या वासुदेवाच्या गाण्याने सुरू झालेला तो नृत्य-संगीताचा खेळ गारुड, लावणी, अभंग, ओव्या, पोवाडे, भावगीत,भक्तीगीत असे करत करत एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला. शो संपेपर्यंत साडे सात झाले, थोड्या वेळ इथे तिथे भटकून मग Dominos चा रस्ता गाठला. सुरुवातीला आई बाबा pizza काही फारसे आवडीने खात नसत. पण आता त्यांच्याही जीभेवर मोझरेलाची चव रुळलीये.
घरी येईपर्यंत खूप उशीर झालेला. आदल्या रात्रीच्या बस प्रवासाचा क्षीण आणि दिवसभराच्या धावपळीचा थकवा ह्यात झोप कधी लागली कळलेपण नाही. सकाळी साधारण: सातला जराशी जाग आली बाहेर पाहिले तर आई बाबा आस्था चॅनेल लावून प्राणायाम करत होते. मी पुन्हा चादर डोक्यावर घेऊन गुडूप झालो.
"अरे नऊ वाजले, तासाभरात लाईट जाईल पुन्हा"
"रविवारी पण ?"
"मग काय, चल उठ आता आणि पॅकिंग करायला घे"

अरे हो, फक्त 2 दिवस होते ह्यवेळी, पोहे आणि चहा झाल्यावर मित्रांना फोन करायला घेतले.सगळ्यांच्या अगदी मनसोक्त शिव्या खाल्या. तक्रारीचा सूरही "अरे निदान एक दिवस सुट्टी घेऊन तरी यायचे" असाच होता. पण client visit आणि upcoming deliveryमध्ये सुट्टीचा विषय काढायची माझी काय बिशाद?
दुपारच्या जेवणात एकूण एक माझ्या आवडीच्या गोष्टी होत्या (नेहमीच असतात म्हणा) आणि शिवाय सोबत घेऊन जायचे भुकलाडु तहानलाडु ते वेगळेच. पोटभर जेवून जरा वमकुक्षी घ्यायचा विचार केला. मध्येच जाग आली तर बघतो तर पंखा फिरायचा बंद, आई लगेच पेपर घेऊन वारा घालू लागली. मी हटकलेच "अग आता हे कशाला?"
"असु दे पुन्हा बस मध्ये नीट झोप नाही लागणार" माझा काही इलाज नव्हता,
थोड्या वेळ झोप काढून निघायच्या तय्यारीला लागलो, जाताना बाबा कॅलंडरकडे बघून बोलले "महावीर जयंतीची सुट्टी आहे का रे तुम्हाला? सोमवारी येतेय, म्हणजे जास्त सुट्टी घ्यायला नको"
"अहो बाबा, MNCमध्ये कसली आलीये महावीर जयंतीची सुट्टी" त्यांच्या पडलेल्या चेहर्‍याकडे बघायची हिंमत नवती माझी. केबलचे पैसे घ्यायल्या येणार्‍या पोर्‍यासारख्या महिन्याच्या महिन्याला आमच्या फेर्‍या होतात, माहीत नाही का; पण अपराधी आणि अगतिकपणाचि एक वेगळीच भावना मनाला चाटुन गेली, practical होण्याच्या नादात आपण दगड तर नाही बनत चाललो ना? तेवढा विचार करायला पण वेळ नव्हता; नाहीतर बस सुटली असती. भले सतत त्यांच्या बरोबर रहता येत नसेल पण असा एखाददुसरा कुटूंबवत्सल weekend घालवायला काय हरकत आहे? बघुया कसे जमतेय ते.

Tuesday 25 March 2008

वळू'या


वळू बघायचा खूप दिवसांपासून डोक्यात होतेच. माझ्या प्रत्येक मुंबई फेरीमध्ये वळू कुठे जवळ्पास लागलाय का ते बघायचो. नवी मुंबई मध्ये भले खूप सारी नवी चित्रपटगृहे उघडली असतील पण एका मध्ये मराठी चित्रपट लागेल तर शपथ्थ! आणि अगदी लागलेच तरी ते मकरंद अनासपुरे नाहीतर भरत जाधव च्या पुढे जाणार नाहीत. ह्यावेळेला मस्त होळीचा long weekend मिळाला आणि वळू बघायचा नक्की करूनच बस मध्ये चढलो. घरी येऊन बघतो तर प्लाझाला 12.30चा शो होता. आता खारघरहून दादर म्हणजे बसने जा नाहीतर ट्रेनने दीड-एक तासाची रपेट आहेच. तरी 11.15ला दादरला पोहोचलोच. प्लाझाला पोहोचे पर्यंत 11.30 झाले. आणि बघतो तर करन्ट बूकिंगसाठी ही भली मोठी लाइन. सेक्यूरिटी वाल्याकडून आधी कन्फर्म करून घेतले लाईन नक्की वळूसाठीच आहे ना की 3.30च्या 'रेस' साठीची ही गर्दी? टिकिट खिडकीवर पोहोचेपर्यंत अजुन एक धक्का मिळालाच (आधी दु:खद पण नंतर सुखावणारा). बाल्कनी चक्क हाउस-फुल्ल, प्लाझाच्या door keeperही बहुतेक मॅटिनीला हाउस फुल्लचा बोर्ड बर्‍याच दिवसानी पहिला असेल. बाबांना executiveच्या लाइन मध्ये उभे केलेले, ते मस्त दिमाखात 3 टिकेट्स घेऊन आले. नेहमीच्या जाहिराती आणि खास मराठी कलावंतनी गायलेले जन-गण-मन झाल्यावर वळू सुरू झाला.


तर हा वळू आहे महाराष्ट्रातल्या कुसवड गावातला, देवाजीच्या नावाने सोडलेला सगळ्यांच्या लाडका वळू(डुरक्या) आधी धटिन्गण आणि मग उपद्रवी बनून जेव्हा गावात धुमाकूळ घालू लागतो. तेव्हा वन-विभागातून खास 'फॉरेस्ट'ची बोलावणी होते. हा चित्रपट वन अधिकारी स्वानंद गड्डमवारच्या नजरेतून आणि त्यांचा लहान भाऊ समीरच्या कॅमेर्‍यातून आपल्याला कुसवड गावाचे रहिवाशी आणि त्यांची छोटी-छोटी स्वप्ने, घुसमट, अडचणी, कट-कारस्थाने दाखवतो. एका बिबळ्या स्पेशलिस्ट वनअधिकार्‍याची (अतुल कुलकर्णी) वळू पकडायच्या मोहीमेवर रवानगी होते, एक थ्रिलिंग documentryकरता येईल म्हणून त्यांचा लहान भाऊ त्याना साथ करतो, त्या दोघांच्या दीमतीला गावचा बडबोल्या जीवन आणि मग सुरू होतो वळू(डुरक्याचा) शोध. गावचे म्हातारे सरपंच आणि तरुण नेतृत्वामधला संघर्ष, शंकारच्या मंदिराची देखभाल करणारे गावातले एकमेव ब्राह्मिण कुटुंब, पिक्चर बघून प्रेमात पडणारी शिवा-संपीची जोडी, सार गाव जरी विरोधात गेले तरी डूरक्याला श्रद्धेने घास खायला घालणारी म्हातारी, डुरक्याला वाचविण्यासाठी खंभीर उभी राहणारी एक वेडी आणि आपल्या पोरीची 'डोक्‍यूमेंट्री' काढून घ्यायला आकाश-पाताळ एक करणारी आई, सगळेच कसे खरे वाटतात आणि त्यामुळेच सहज भावतात. चित्रपट कुठेच खूप गदागदा हसवत नाही की फार मोठा सामाजिक संदेश देत नाही, तो आपल्याला त्या गड्डमवारसाहेबांबरोबर कुसवडला घेऊन जातो आणि डुरक्याला पकडून घेऊन पुन्हा आपल्या घरी आणून सोडतो. एक साधी सरळ कथा तेवढ्याच साध्या सरळ पद्धतीने मांडतो. नजीकच्या काळात गावाला जाणे झालेच नाही म्हणुनही असेल कदाचित पण कुसवड गाव बघता क्षणीच आपलेसे वाटते.

अतुल कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर , मोहन आगाशे, भारती आचरेकर, निर्मीती सावंत आणि ज्योती सुभाषसारखे दिग्गज आपली भूमिका अगदी जगले आहेत. गावातली रख-रखित शेते आणि नागमोडी रस्ते आणि त्यामध्ये उभा उमादा डुरक्या, जोडीला साजेसे असे पार्श्वसंगीत वळूच्या सगळ्याच बाजू जमेच्या वाटल्या. 2 तासात गावाची रॅपेट मारुन पुन्हा आपल्या जागी परत. वळू 9व्या आठवड्यात पण हाउस-फुल्ल कसा याचे उत्तर मला मिळाले. आणि मागल्या काही आठवड्यात मी sunday आणि 10000 B.C. सारख्या moviesवर एवढा वेळ आणि पैसा का फुकट घालवला? असे प्रश्न उभे राहीले. सगळेच नवीन मराठी movies काही बघणेबल नाहीत पण गेले काही अनुभव (यंदा कर्तव्य आहे, मातीच्या चुली आणि नितळ सारखे निखळ चित्रपट) पाहिल्यावर खरच असे वाटते निदान मराठी चित्रपट पाहायला तरी आता चित्रपटगृहांकडे वळूया.