Sunday, 6 November 2016

या रे या। सारे या।

गेल्यावेळी जेव्हा आई बाबांबरोबर 'वळू' चित्रपट बघितला तेव्हाच मराठी सिनेमा काहीतरी वेगळे करतोय आणि प्रेक्षकांना काहीतरी विलक्षण देतोय ह्याची जाणीव होत होती. आज आठ वर्षानंतर 'व्हेंटिलेटर' बघताना लक्षात येते कि इतक्या वर्षात मराठी सिनेमा किती प्रगल्भ झालाय. ज्या चित्रसृष्टीत नटसम्राट, सैराट आणि व्हेंटिलेटर सारखे सिनेमे एकाच वर्षात येतात, त्याला मराठी सिनेमासाठी हा सुवर्णकाळच म्हंटला पाहिजे.

तर आता थोडे 'व्हेंटिलेटर' 'वळु'या, मला वळू आणि व्हेंटिलेटर मध्ये बरेंच साम्य वाटले. तिथे जसा वळू हा केवळ निमित्तमात्र होता आणि मूळ कथा हि त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये गुंतलेली होती, तसंच इथेही काहीसं आहे. व्हेंटिलेटरवर असलेले गजानन कामेरकर हे म्हणजे निमित्त, खरी कथा हि त्यांच्या गोतावळ्याची.

व्हेंटिलेटर चे खरं यश हे त्याच्या ११६ कलाकारांना स्वतंत्र व्यक्तिमत्व देणाऱ्या त्याच्या पटकथेत आहे. गोष्ट तशी छोटीचं आपल्या आजूबाजूला घडणारी पण त्यातली पात्र परकी नं वाटता आपल्याच ओळखीची वाटतात.

काळाच्या रेट्यात दुरावत गेलेली नाती, अहं आणि स्वार्थाच्या ओझ्याखाली गुदमरलेली आपुलकी आणि मुळातच लोप पावत चाललेली कुटुंबव्यवस्था हा सिनेमा आपल्या डोळ्यापुढे आणून ठेवतो. आणि आपसूकच आपण त्यात गुंतत जातो, त्या पात्रामध्ये कित्येक वेळा आपण आपली दूरची मावशी किंवा गावचे काका पाहतो. सिनेमातले एक वाक्य माझ्या मनात घर करून राहिले "नाती टिकवणे म्हणजे रोज सकाळी ब्रश करण्यासारखे आहे, सतत घासत नाही राहिलं तर त्यावर थर जमा होतो".

रोजच्या रुटीन मध्ये अडकलेल्या आपल्यापैकी किती जणांना नाती जपायची ओढ आहे? सुखाच्या किंवा दुःखाच्या क्षणी भेटण्याखेरीज कोण कोणाला सहज भेटतो आजकाल? असे अनेक प्रश्न हा चित्रपट आपल्या समोर आणतो आणि काहीसा अंतर्मुग्ध करतो.  एखाद्या सिनेमा साठी ह्याहून मोठे यश ते काय?

वळू बघताना मी म्हंटले होते की मराठी सिनेमाच्या ह्या नव्या वाटेकडे 'वळू'या, आज व्हेंटिलेटर बघून आल्यावर म्हणावेसे वाटतंय कि मराठी सिनेमाच्या या सुवर्णयुगात या रे या । सारे या।

No comments: